पुणे – कसबा मतदार संघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या रवींद्र धंगेकर आणि पक्षाने उमेदवारी दिलेल्या अरविंद शिंदे यांच्यात दिलजमाई झाली असून, धंगेकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धंगेकर यांनी अर्ज दाखल केला नाही.
“कसबा विधानसभा मतदारसंघात मी देखील उमेदवार झालो असतो, तर कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांवर त्याचा परिणाम झाला असता. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच झाला असता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखणे महत्वाचे असून, त्यासाठीच उमेदवारी अर्ज दाखल न करता पूर्ण ताकदीने शिंदे यांना पाठिंबा देत आहे,’ अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली.
यावेळी त्यांच्या कार्यालयात कॉंग्रेस नेते मोहन जोशी, शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे,कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक, बाळासाहेब अमराळे, दत्ता सागरे आदी कायकर्ते उपस्थित होते.