राज्यात 10 जागांवर धनगर समाजाचे उमेदवार

जगन्नाथ जानकर यांची घोषणा; माढ्यातून सचिन पडळकर आखाड्यात

सातारा – राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षांनी आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर धनगर समाजाची फसवणूक केली तर आता 48 पैकी एकाही जागेवर उमेदवारीदेखील दिली नाही. म्हणून माढ्यासह 10 जागांवर धनगर समाजाचे उमेदवार निवडणूक लढतील आणि जिंकतील, असा विश्‍वास जगन्नाथ जानकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, माढा मतदार संघातून सचिन पडळकर आखाड्यात उतरणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सचिन पडळकर, विनायक मासाळ, अण्णासाहेब सुळ, सचिन होनमाणे, पप्पू शिंगाडे, शिवराज पुकळे, अक्षय वणरे यांच्यासह युवक उपस्थित होते.

यावेळी पडळकर म्हणाले, माढ्यातील सहा विधानसभा मतदार संघातील समाज बांधव व युवकांशी चर्चा करूनच निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालपर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने धनगर समाजाला फसवले. तसेच पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेवू, असे आश्‍वासन देणाऱ्या भाजपनेही समाजाची फसवणूक केली. सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केले. त्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, आरक्षणाच्या मुद्‌द्‌यापासून लक्ष विचलित करण्यासाठी नामकरणाचा निर्णय घेण्यासाठी त्यांना निवडणुकीचा मुहूर्त काढावा लागला. जानकर म्हणाले, आता लागलेल्या लोकसभा निवडणुकीतदेखील भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक धनगर समाजाला डावलले आहे.

चारही पक्षांनी एकाही धनगर समाज बांधवाला उमेदवारी दिली नाही. यावरून पक्षांची नियत स्पष्ट होते. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळाले तर हक्काचे 10 लोकसभा व 40 विधानसभा मतदार संघातून प्रीतिनिधी निवडून जावू शकतात. मात्र, आम्हाला प्रतिनिधित्व मिळूच नये, असा प्रस्थापित पक्षांचा डाव आहे.हा डाव उधळून लावण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी माढ्यासह दहा जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे जानकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.