मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. नातेवाईक असलेल्या तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी खुलासा केला असून त्यांचा खुलासा सर्वांच्याच भुवया उंचावणार आहे.
संबंधीत तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणी मदतीसाठी मदतीसाठी साद घातली आहे.
या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहे.
मुंडे पुढे म्हाणाले की, करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. तसेच करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत
कालपासून समाज…
Posted by Dhananjay Munde on Tuesday, 12 January 2021
दरम्यान नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील सुनावण्यांसाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्यामुळे यावर मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. तसेच माध्यमांनी देखील या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.