बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिरूर मध्ये झालेल्या जाहीर सभेत सरकारवर टीका केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. सत्ताधारी हे लोकांची जातपात काढणारे असून, ते जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
सध्याचे सत्ताधारी नेते हे विकासावर भाष्य करत नाहीत. मात्र माझ्या घटलेल्या वजनावर चर्चा करतात. अशा नेत्यांना लोकप्रतिनीधी म्हणावे का? असा सवाल त्यांनी विचारला. पुढे बोलताना, माझे शारीरिक वजन कमी झालं असले तरी राजकीय वजन वाढले आहे हे ध्यानात असू द्या, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
परभणी येथील जाहीर सभेत तोडपाणी करणारे नेते हे गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार होऊच शकत नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती. त्यानंतर आज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडे यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचे ऊसतोड महामंडळ रद्द केल्यानंतर गप्प बसणारे हे त्यांचे कसले वारसदार? असा खोचक प्रश्न विचारत, बीडमध्ये ७८ सिंचन प्रकल्पापैकी एकही पूर्ण झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार सांगणाऱ्या बीडच्या खासदारांना साधा रेल्वेचा कारखाना देखील आणता आला नसल्याचे सांगत, सध्याच्या रेल्वे प्रकल्पाचा स्पीड बघता आपली नातवंड तरी रेल्वे पाहतील का अशी शंका असल्याचे ते म्हणाले.