Dhananjay Munde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, अजित पवारांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळख असणारे मंत्री धनंजय मुंडे यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे. अजित दादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत . प्रवासादरम्यान आपल्या एका सहकाऱ्यांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांनी बोलताना, “माझे वडील गेल्यानंतर दादांनी कधीच त्याची कमी भासून दिली नाही” असे म्हणत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अजित दादा व धनंजय मुंडे यांचे एक वेगळेच नाते होते. पक्षातील सर्वात लाडका कोण, असे विचारल्यास दादा जाहीरपणे धनंजय मुंडे यांचे नाव घेत असत. त्यामुळे अजित दादांच्या अकाली निधनाचे धनंजय मुंडे यांच्यासाठी दुःख मोठे असल्याचे दिसत आहे.