मुंबई – जगभरामध्ये करोना व्हायरसचा कहर दोन वर्षापासून कायम आहे. सरकारने काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीचे कामकाज सुद्धा काही प्रमाणात ठप्प झाले असून, संपूर्ण चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली आहे.
अशा परीस्थित अनेक कलाकारांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. नव्या आशयासह नवे कलाकार ओटीटीवर धुमाकूळ घालत आहेत. याच कारणामुळे अनेक सुपरस्टार्स देखील वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सामील होत आहेत.
आता या यादीत बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही समावेश होणार असून, नुकतीच माधुरी दीक्षित हिच्या पहिल्या वेब सीरीजविषयी माहिती समोर आली आहे. माधुरी प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या प्रोडक्शनमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षितची ही वेब सीरीज ‘फॅमिली ड्रामा’ असणार आहे. ‘दीवार’ चित्रपटाच्या ‘मेरे पास माँ है’ या संवादातून त्याचे नाव ठेवण्यात येणार आहे. नावाप्रमाणेच ही सीरीज देखील विशेष असणार आहे.