एकीकडे दक्षिणेतील चित्रपट जोरदार कमाई करत असताना बॉलीवूडचे चित्रपट मात्र धडाधड कोसळू लागले. त्याबाबत…
धाकड, जर्सी, जयेशभाई जोरदार, रनवे-34 आणि हीरोपंती 2 हे चित्रपट याचे ज्वलंत उदाहरण आहेत. बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मने देखील त्यांच्याकडे पाठ फिरविली. अनेक चित्रपटांना ओटीटीवर खरेदीदार मिळाला नाही. आता काही निर्माते आपला चित्रपट थेट ओटीटीवरच प्रदर्शित करण्याची योजना आखत आहेत. या श्रेणीत सर्वात पहिले नाव कंगना राणावतचे आहे. “धाकड’ चित्रपट पडल्यानंतर कंगना राणावत आणि “तेजस’ चित्रपटाचे निर्माते आरएसव्हीपी कंपनी आपला चित्रपट प्रथमच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची योजना आखत आहेत.
एवढेच नाही तर धाकड चित्रपटांत झालेल्या चुकांपासून वाचण्यासाठी चित्रपटांतील अनेक दृश्य पुन्हा चित्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांच्या मते, सद्यस्थितीत दक्षिणेतील चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटांची स्थिती बिकट बनली असून ते पाहता हिंदी चित्रपट ओटीटीवर रिलीज करून चांगली कामगिरी करू शकतात. चित्रपटाचा खर्च कमी राहील आणि फायदाही चांगला राहू शकतो. त्याचवेळी फ्लॉप होण्याचा धोकाही राहणार नाही. अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, ओटीटीवर चांगली कमाई केल्याचेही घडले आहे. पण एकदा फ्लॉपचा शिक्का बसल्यानंतर आणि निगेटिव्ह पब्लिसिटी झाल्यानंतर ओटीटीवर देखील त्याची खरेदी करण्यास पुढे कोणी येत नाही. यासाठी चित्रपट “धाकड’चे उदाहरण पाहू. बॉक्स ऑफिसवर सपशेल पडल्यानंतर सॅटेलाइट, डिजिटल राइट्स खरेदी करण्यासाठी कोणीही तयार झाला नाही.
“धाकड’ हा चित्रपट संपूर्ण भारतात 2200 स्क्रिनवर रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर एक आठवड्यानंतर केवळ 25 स्क्रिनवर चित्रपट सुरू होता. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात 99 टक्के थिएटर्समधून हा चित्रपट उतरविण्यात आला. बॉलीवूडपटांची सर्वाधिक कमाई ही मुंबईच्या चित्रपटगृहांतून होत असताना या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यात मुंबईच्या कोणत्याही चित्रपटगृहात नामोनिशाण देखील नव्हते. चित्रपटांच्या एकूण उत्पन्नात 40 टक्के वाटा हा मुंबई आणि उपनगरचा असतो. परंतु पहिल्याच आठवड्यात वाईट कामगिरीनंतर मुंबईच्या चित्रपटगृहांतून हा चित्रपट काढून टाकण्यात आला. चित्रपटाची एवढी वाईट स्थिती पाहून कोणीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याची खरेदी करण्याचे धाडस दाखवले नाही. अन्यथा चित्रपटातून 80 ते 100 कोटी रुपयांत सहजपणे विक्री झाली असती.
काहींना ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमाई कशी होते याबद्दल उत्सुकता वाटत असेल.
अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, एमएक्स प्लेअर, अल्ट बालाजी, वूट आणि जी फाइव्ह सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म हे चित्रपट निर्मांत्यांकडून एखाद्या वितरकाप्रमाणेच चित्रपटाचे किंवा डिजिटल हक्क खरेदी करतात. निर्मातेदेखील आपल्या बजेटला नफ्याशी जोडून ओटीटी प्लॅटफॉर्मला चित्रपटाची विक्री करतात. या रचनेत डिस्ट्रिब्यूटरच्या भूमिकेत ओटीटी प्लॅटफॉर्म असते. चित्रपटाशी केलेला करार हा भाषेनिहाय वेगळा असतो. जर चित्रपट ओटीटीवर स्ट्रिम होत असेल तर त्याची किंमत अधिक असते. अशा परिस्थितीत बजेट आणि नफ्याचे आकलन करून त्याची किंमत काढली जाते. चित्रपट टॉकिजवर अगोदर झळकत असेल तर त्याची किंमत केवळ डिजिटल राइट्सपुरतीच मर्यादित राहते. थिएटरमध्ये एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवड्यांनंतर ओटीटीवर चित्रपट स्ट्रिम करण्यात येतो. अनेकदा तर हायब्रिड मॉडेलमध्ये देखील रिलीज केला जातो.
हायब्रिड मॉडेलचा अर्थ असा की, एखादा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म आणि थिएटर्सवर एकाचवेळी रिलीज करणे. प्रेक्षक ज्याप्रमाणे तिकीट खरेदी करून चित्रपट पाहतात, त्याचप्रमाणे ओटीटीवर “पे पर व्ह्यू’मोडवर चित्रपट पाहता येतो. सलमान खानचा “राधे : यार मोस्ट वॉंटेड भाई’ हा हायब्रिड मॉडेलने रिलीज होणारा पहिला हिंदी चित्रपट. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जी-फाइव्ह आणि चित्रपटगृहात एकाचवेळी प्रदर्शित करण्यात आला. जी-प्लेक्सवर चित्रपट एकदा पाहण्यासाठी 249 रुपये बुकिंग फीस ठेवली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्राइर्ब्सला देखील या श्रेणीतून पैसे देऊन चित्रपट पाहावा लागतो. अर्थात हे मॉडेल फारसे यशस्वी झाले नाही. यादरम्यान ओटीटीवर थेटपणे रिलीज होणाऱ्या चित्रपटांना आपल्या खर्चाच्या तुलनेत चांगला फायदा मिळाला. उदा. अमिताभ बच्चन यांना गुलाबो सिताबो, अक्षयकुमार याचा लक्ष्मी, संजय दत्तचा सडक-2, अजय देवगण याचा भूज, अभिषेक बच्चन याचा द बिग बुल आणि विद्युत जामवला याचा खुदा हाफिज हे ओटीटीवर रिलीज झाले. यात गुलाबो सिताबोसाठी 65 कोटी रुपये (खर्च 35 कोटी), लक्ष्मी चित्रपटाला 125 कोटी (खर्च 60 कोटी), भूज ला 110 कोटी (100 कोटी) “द बिग बुल’ला 40 कोटी (35 कोटी) या किमतीमध्ये ओटीटीने खरेदी केले होते.
ओटीटीवर थेट चित्रपट रिलीज केल्यामुळे चित्रपटांना फारसे नुकसान सहन करावे लागत नाही. चित्रपटांची स्टारकास्ट आणि मार्केटिंग चांगली राहिली तर अनेकदा ओटीटीवरील खर्चापेक्षा दुप्पट पैसे निर्मात्यांना मिळतात. उदा. अक्षयकुमारचा चित्रपट लक्ष्मीचे उदाहरण पाहू. या चित्रपटाचा खर्च 60 कोटी रुपये आहे. त्याचवेळी डिस्ने प्लस हॉटस्टारने या चित्रपटाचे हक्क 125 कोटी रुपयांत खरेदी केले होते. एवढी किंमत मोजूनही ओटीटी प्लॅटफॉर्म चांगला फायदा वसूल करतात. या फायद्याला तीन श्रेणीत विभागले जाते. पहिले म्हटजे टीव्हीओडी म्हणजेच प्रत्येक यूजर हा कोणताही कंन्टेट जेव्हा डाउनलोड करतो, तेव्हा त्यासाठी एक शुल्क द्यावे लागते. दुसरे म्हणजे एसव्हीओडी म्हणजेच यूजरला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मला कन्टेंट पाहण्यासाठी कोणताही पैसा द्यावा लागत नाही. त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे सबस्क्रिप्शन मोफत असते. परंतु या ठिकाणी यूजरला जाहिराती पाहव्या लागतात. जसे की एमएक्स प्लेअरचे सबस्क्रिप्शन फ्री असते. मात्र, यावर दाखविण्यात येणाऱ्या वेब मालिका आणि चित्रपटात जाहिरातींचा मारा असतो. जसे यूट्यूबवर सर्व व्हिडिओ मोफत पाहतो, परंतु जाहिरातीदेखील पाहव्या लागतात.