– संतोष वळसे पाटील
अवैध दारूविक्री सुरू असताना पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी मात्र मौन बाळगून आहेत. जेवणाचे ढाबे नावाला असून दारू विक्रीसाठी ढाबे बनल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना त्यांना व्यसनाचे दुष्परिणामाबाबत प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मंचर-पारगाव कारखाना, पेठ-कुरवंडी, मंचर-घोडेगाव-डिंभे, मंचर-रांजणी, मंचर पिंपळगाव मार्गे निरगुडसर इत्यादी रस्त्यांवरील हॉटेल, ढाब्यांमध्ये खुलेआम दारू मिळत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांना माहित असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. जेवणाचे ढाबे सुरू करुन त्यामध्ये स्वस्तातील दारू विक्री केली जाते. काही हॉटेल, ढाब्यावर बनावट दारुची विक्री करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.दारूविक्री बंद व्हावी म्हणून काही गावांनी ग्रामसभेत ठराव करुन पोलिसांना दिले आहेत, परंतु पोलिसांनी ग्रामसभेच्या ठरावांना दाद दिली नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.
दारू सहजपणे कोठेही मिळत असल्याने तरुणवर्ग दारुच्या आहारी जाऊ लागला आहे. अनेक तरुण स्वस्तातील बनावट दारुचे शिकार बनल्याने अनेक कुटुंब रसातळाला गेली आहेत. दारूबंदी व्हावी म्हणून गावांतील महिला, ज्येष्ठ नागरिक प्रयत्नशील आहेत, परंतु पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची साथ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दारू विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने दारुविक्री करणारे हॉटेलचालक, ढाबेचालक यांची गावात दहशत वाढली आहे.
पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री बंद व्हावी म्हणून अर्ज करणारे नागरिक यांना संबधित कर्मचारी मात्र तक्रार करणाऱ्याचे नाव सांगून एकप्रकारे संबंधितावर दबाव आणण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे दारुविक्री करणाऱ्यास सुगीचे दिवस आले आहेत.