ज्ञानेश्वर फड/ प्रीतम पुरोहित
फलटण –संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील शुक्रवारी दहावा दिवस होता. दि.2 पर्यंत हा सोहळा फलटण मुक्कामी असेल. दोन वर्षांच्या अंतराने यंदा पालखी सोहळा होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. अशा वेळी पोलिसांना मदत करण्यासाठी फलटण येथील नॅशनल अकॅडमी कॅम्पचे 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यामध्ये 140 मुले आणि 40 मुलींचा समावेश आहे.
“आम्ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहोत. तरडगाव ते बरडपर्यंत आम्ही ही सेवा करतो. पालखी फलटण येथे मुक्कामी असते, तेव्हा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेतो.
वाहतूक व्यवस्था, दर्शनबारीत भाविकांना रांगेत सोडणे, वारकरी आंघोळीसाठी नदीवर गेले असता त्यांचे साहित्य चोरी होऊ नये यासाठी तेथे लक्ष ठेवणे, आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी घेऊन त्यांना बचावकार्य यांसह लागेल ती सेवा आम्ही करतो. ही निःशुल्क सेवा आहे. सेवा करताना एक वेगळा आनंद मिळतो. ही सेवा आम्हाला मिळते हे आम्ही आमचे भाग्य समजतो, अशा भावना सैन्यातील माजी अधिकारी तथा ऍकॅडमीचे संचालक कुमार परदेशी यांनी व्यक्त केल्या.
गर्दीचं नियोजन करून कुठल्याही विधीला अडचण येणार नाही, यासाठी पुरेसं मनुष्यबळ असणं ही बंदोबस्तासाठी जमेची बाजू असते. पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मोठी असल्याने स्वयंसेवकांची आम्हाला मोठी मदत होते. या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होतो. तसेच या युवकांना भविष्यात कामासाठी जबाबदारीचे भान, प्रेरणा मिळते. त्यांच्यामुळे आमचे काम सुकर होते.
– तानाजी बरडे, पोलीस उप अधीक्षक, फलटण
स्वयंसेकाकडून देण्यात येणाऱ्या सेवा…
-पालखी दर्शनबारी व्यवस्थापन
-पालखी तळावर मानवी साखळी करून गर्दीवर नियंत्रण
-स्नानासाठी गेलेल्या वारकऱ्यांच्या साहित्यावर लक्ष ठेवणे
-चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडणे
-कोणी जखमी झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे
-वारकऱ्यांना लागेल ती मदत