तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात कपडे परिधान करण्यावरून काही नियम घालून दिले आहेत. त्यामुळे आता भविकांना मंदिरात जाण्यापूर्वी असभ्य कपडे घालण्यास बंदी घातली आहे. भवानी मातेच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ त्यासंबधीत फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून मंदिरात असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना प्रवेश नसणार आहे.
तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक मंदिरात लावण्यात आले आहेत. या फलकाद्वारे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
या नियमानुसार आता बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे, अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही.
ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. याचे पालन करण्याची विनंती मंदिर व्यवस्थापनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या भवानी मातेचा खास इतिहास आहे. या मंदिरात लाखों भाविकांची गर्दी होत असते.