करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहू संस्थानाने तीन दिवस मंदिर ठेवले बंद
देहूगाव – करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांनी तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दरवर्षी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक देहूनगरीत येतात त्यात घट झाली होती. परंतु नित्यनियमाने वारी करणारे काही वारकरी व भाविक तीर्थक्षेत्र देहूगाव येथे आले होते. भाविकांनी मंदिर बंद असल्याने मुख्य मंदिराच्या महाद्वाराचे व कळसाचे दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करून प्रस्थान केले.
गुरुवारी कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी देहूरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा असते. परंतु ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य नाही ते भाविक व वारकरी देहू, आळंदी येथे संत दर्शनासाठी येत असतात. परंतु यावर्षी करोनामुळे मार्चपासून मंदिरे बंद ठेवण्यात आली होती.
दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर शासनाने मंदिरे खुले करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. परंतु देहूगाव ग्रामपंचायत आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र देहू येथे येणाऱ्या भाविकांना महाद्वारातून कळसाचे दर्शन घेऊन परतावे लागत आहे.
देशभरात कोविड-19 संसर्ग अजूनही आटोक्यात आला नाही. अशातच दुसरी लाट वाढण्याची भीती आरोग्य संस्थांनी व्यक्त केल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप मधुकर महाराज मोरे, विश्वस्त हभप संजय महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप संतोष महाराज मोरे, हभप काशिनाथ महाराज मोरे यांनी माझे गाव, राज्य, देश, माझी जबाबदारीला अनुसरून शासनाच्या कोणतेही निर्णय, परिपत्रक, आदेशाची वाट न पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संस्थानने बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस (दि. 25 ते 27) मुख्य मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्तिकी एकादशी निमित्त गुरुवारी मुख्य मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मुख्य मंदिर बंद असल्याने आलेल्या दिंड्यांसह भाविकांना मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराचे व कळसाचे दर्शन घेत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
देहूत पोलीस बंदोबस्त
1 सहाय्यक पोलीस आयुक्त
2 पोलीस निरीक्षक
8 पोलीस अधिकारी
30 पुरुष पोलीस अंमलदार
10 महिला पोलीस अंमलदार