मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील मानाचा पहिला गणपती म्हणून ४५ वर्षाची अखंड परंपरा असलेल्या मयूर गणेश मंडळाने गंगा जमुना महालाचा परंपरा दाखवणारा देखावा साकारला आहे. देखावा पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
गणेशमूर्ती सहा फुट उंचीची असून संपूर्ण इको फ्रेंडलीची मूर्ती आहे. मंडळाने गंगा जमुना महालाचा परंपरा दाखवणारा देखावा साकारला आहे.
श्री गणरायाच्या मूर्तीला सव्वा पाच किलो वजनाची चांदीची कलाकुसर केलेले अलंकार, आभूषणे मंडळाने नव्याने केली आहेत.
कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी न मागता गेली ४५ वर्ष मंडळातील सदस्य स्ववर्गणीतून संपूर्ण उत्सव साजरा करत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमाकांत खोल्लम यांनी दिली.
मंडळाच्या वतीने नित्य भजन, आरतीसह भावगीत, भक्तीगीतांचा आॅर्केस्ट्रा तसेच महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रींचा विसर्जन सोहळा हा आगळावेगळा असून न्यू अमर ब्रास बँड बारामती व देशभक्तीपर समूहनृत्य, ध्वज पथक या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,
अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे अवसरी खुर्द गावठाण, खालचा शिंदेमळा, खडकगाव, बोल्हाई माता मंदिर, कौलीमळा, टेमकरमळा, कराळेवाडी, वायाळमळा, पंधराबिघा, शासकीय कॉलेज, अभंगमळा, खेडकरमळा येथील गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीपुढे आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई केली आहे.
गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी चमचा लिंबू, संगीत खुर्ची, फनी गेम्स तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा यासह विविध लहान मोठे खेळ स्पर्धांचे आयोजन केले असून अनेक ठिकाणी भजन, संगीत स्पर्धा यासह विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे