चंदिगड – नांदेडमधील भाविकांना करोना विषाणूचा संसर्ग पंजाबी चालकांमुळेच झाला असावा. नांदेडमधील गुरुद्वारामधून पंजाबमध्ये भाविक ज्या बसमधून गेले होते, त्या बसच्या पंजाबी चालकांमुळे करोनाचा संसर्ग पसरल्याची शक्यता कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या या दाव्याला पंजाबमधील नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
नांदेडमधील गुरुद्वारा श्री लंगर साहिबमधील 20 सेवादारांना करोनाची लागण झाल्याचे शनिवारी उघड झाले. पंजाबमधून आलेले आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले भाविकही या गुरुद्वारामध्ये राहिले होते. स्थानिक भाविकांबरोबर पंजाबमधील भाविकांनाही करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
पंजाबमधून नांदेडमध्ये येऊन भाविकांना परत घेऊन गेलेल्या चालकांना त्यांच्या प्रवासादरम्यानच करोनाचा संसर्ग झालेला असावा. त्याच चालकांमुळे नांदेडमधील गुरुद्वारामध्ये करोनाचा संसर्ग आला असावा आणि परतीच्या प्रवासादरम्यान भाविकांनाही हा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बोलताना व्यक्त केली होती.
नांदेडमधील भाविकांना परत नेण्यासाठी 26 एप्रिल रोजी एकूण 78 बस पंजाबमधून नांदेडला आल्या होत्या. त्या प्रत्येक बसमध्ये 2 चालक होते. हे सर्व चालक 2 दिवस नांदेडमध्येच मुक्कामाला होते. त्याचवेळी त्यांच्यामुळे गुरुद्वारामध्ये हा संसर्ग पसरला असावा, असे चव्हाण म्हणाले होते.
मात्र चव्हाण यांचा दावा दिशाभूल करणारा आणि चुकीचा असल्याचे पंजाबचे परिवहन मंत्री रजिया सुलताना यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे पडताळणी न करता दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जाऊ नयेत, असे त्या म्हणाल्या.
पंजाबवरून महाराष्ट्रात पाठवलेली सर्व वाहने आणि कर्मचारी महाराष्ट्रातीलच होते. खासगी वाहनांद्वारे पंजाबमध्ये आलेले पहिल्या 3 गटांची व्यवस्था स्थानिक पातळीवर केली गेली होती. पंजाब सरकारने व्यवस्था केलेल्या बस नांदेडमध्ये 27 एप्रिल रोजी सकाळी पोहोचल्या आणि लगेच रात्री तेथून परतीच्या प्रवासाला निघाल्या. त्या बस 29 आणि 30 एप्रिलला भटिंडाला पोहोचल्या. पंजाबच्या बस नांदेडला पोहोचण्यापूर्वीच खासगी बसने प्रवास करतान भाविकांना करोनाची लागण झाली असावी, असे त्या म्हणाल्या.