शिंदे वासुली : चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरावर श्रावण महिन्यात येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असते. मात्र, यंदा करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने डोंगर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाळूंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना तसे निवेदन देऊन दर सोमवारी डोंगराच्या पायथ्याशी पोलिसांचा बंदोबस्त देण्याची विनंती केली आहे.
श्रावण महिन्यात डोंगरावर देवदर्शनासाठी गर्दी होऊन करोनाचा फैलाव होऊ शकतो, तसेच डोंगरावर वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारे अनेक साधक वास्तव्याला असतात. त्यांचे संरक्षण करण्यासाठी डोंगर सर्व भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास गोसावी, पोलीस पाटील अमोल पाचपुते, गुलाब मिंडे, दिपक राऊत, राहूल साकोरे, भामचंद्र डोंगर सप्ताह समितीचे हभप शंकर महाराज मराठे, हभप किसन पिंजण, मालक पाचपुते, तुकाराम तरस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.