पिंपरी – उत्तर भारतीयांचा सण असलेल्या छटपूजा पर्वाला आजपासून (दि.18) सुरुवात झाली आहे. राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने, छटपूजेला देखील परवानगी द्यावी, यासाठी बिहार व उत्तर भारतीय भाविक आग्रही आहेत. धार्मिक विधी साजरे करताना राज्य सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची ग्वाही देत हा सण साजरा करण्यासाठी शहरातील नदीपात्रांची स्वच्छता करुन आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी (दि.16) राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना सशर्त उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बिहार व उत्तर भारतातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या नागरिकांकडून दरवर्षी छटपूजा पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मात्र, करोनामुळे छटपूजा पर्व साजरे करण्यावर बंधने असल्याने हे नागरिकदेखील फारसे आग्रही नव्हते.
मात्र, पाडव्यापासून राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्यात आल्याने, छटपूजा साजरी करताना आम्ही आवश्यक ती खबरदारी घेऊ, अशी ग्वाही या नागरिकांकडून दिली जात आहे. सद्यस्थितीत शहरातील नदीघाटांची स्वच्छता झाली नसल्याने छटपूजा साजरी करण्यासाठी पूरक वातावरण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तातडीने नदीपात्र व घाटांची स्वच्छता करुन ते छटपूजेकरिता प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याची मागणी उत्तर भारतीय नागरिकांकडून होत आहे.
शहरातील धार्मिकस्थळे उघडण्यात आली आहेत. उत्तर भारतीयांचा धार्मिक कार्यक्रम असलेल्या छटपूजेला परवानगी दिल्यास आवश्यक ती खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
– विजय गुप्ता, कार्याध्यक्ष, छटपूजा समिती, चिंचवड