BCCI चे माजी सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर बीसीसीआयचे सचिवपद मागच्या काही महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर तर आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्ष ही दोन पदे रिक्त होती.
रविवारी मुंबईत बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड करण्यात आली आहे. देवजीत सैकिया हे पुढील 10 महिन्यांसाठी बीसीसीआयचे सचिव असणार आहेत.
Congratulated Shri @lonsaikia dangoriya on being elected as the Secretary and Shri @prabhtejb ji as the Treasurer of the Board of Control for Cricket in India (BCCI) along with the Apex Council Members of Assam Cricket Association at BCCI's Mumbai office, today.
Wishing you both… pic.twitter.com/ZQywtwjYF9
— Taranga Gogoi (@tarangagogoi) January 12, 2025
कोण आहेत देवजीत सैकिया?
सैकिया यांनी 1991 मध्ये आसामसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. विकेटकीपर आणि मिडिल आर्डर फलंदाज म्हणून त्यांनी 4 सामने खेळले. परंतु 21 वर्षांचे असताना त्यांनी क्रिकेट सोडलं आणि वेगळी वाट धरली. सैकिया यांची आसाम राज्याचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आसाम सरकारचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट संघटनांशिवाय इतर क्रीडा संघटनांचाही ते कारभार पाहतात.सैकिया हे गुवाहाटी टाऊन क्लब आणि गुवाहाटी स्पोर्ट्सचे सचिव देखील आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी जाहीर होणार संघ?
येत्या 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. तर शेवटचा सामना 9 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 12 जानेवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत होती. मात्र टीम इंडियाने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. बीसीसीआयने आयसीसीकडे ही मुदत वाढवून मागितली असून 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात येणार आहे.