Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी काल (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, शपथ घेताना फडणवीस यांनी ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस…’ असं म्हंटल होत. आणि १० वर्षांपूर्वी शपथ घेताना ‘मी देवेंद्र गंगाधरराव फडवणीस…’ असा नावाचा उल्लेख केला होता.
या दोन्ही शपथविधींमध्ये एक फरक आहे. तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नावासमोर आईचंही नाव लावलेलं आहे. आईचं नाव घेऊन शपथ घेणारे फडणवीस हे राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्या आईचं नाव घेतलं आहे.
आता फडणवीसांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी असं का केलं? तर याच वर्षी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या महायुती सरकारने एक अध्यादेश काढला होता. ११ मार्च २०२४ ला मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला. या निर्णयानुसार शासकीय कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावासह आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं.
या निर्णयाला मंत्रिमंडळाकडून मंजूरी मिळाली आणि अवघ्या तीन दिवसातच म्हणजे १४ मार्च २०२४ ला याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला. महत्त्वाची बाब म्हणजे हे अध्यादेशाची अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनाबाहेरची पाटी बदलून केली. त्यांच्या दालानबाहेर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार आणि देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशी पाटी लावण्यात आली.