मुंबई – भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता या प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘शरद पवार यांच्याबाबत असे शब्द वापरणे चुकीचे आहे.’ असं पडळकरांना सांगितल्याची माहिती दिली.
तत्पूर्वी, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं विधान केलं होतं. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उठली आहे.
दरम्यान, सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, “मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असं सांगितलं
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर पडळकर यांना त्यांच्या वक्तव्यावरून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.