देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

मुंबई : अनिल देशमुख यांनी विधानसभेत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी बोलताना म्हटले, अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबले असे म्हणणे चुकीचे आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहात देखील सांगतला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील न्यायालयाचा अवमान करणारं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून ते त्यांनी जाणूनबुजून केले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अन्वय नाईक यांच्याबद्दल केलेले विधान अनिल देशमुख यांनी एकदा केले नसून त्यांची पुनरावृत्ती केली. सदर वक्तव्य करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा भंग त्यांनी केला आहे. हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करा, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला काल दिले होते. “मी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचं थोबाड अक्षरश: काळं झालं आहे. जो तपास केला, त्यावर ताशेरे ओढले ते गृहमंत्री विसरले वाटतं. गृहमंत्र्यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही हे उत्तर आहे. तरीही त्यांना खुलं आव्हान दिले आहे, अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी माझी चौकशी जरुर करावी, पण अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.