मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर रविवारच्याच दिवशी विरोधी पक्षनेत्यांचीही निवड होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी विधानसभेच्या कामकाजात भाजप नेत्यांनी प्रचंड गदारोळ केल्यानंतर विधानसभेच्या रविवारच्या कामकाजात विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा समावेश करण्यात आला नव्हता.परंतु, आता विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आजच विरोधी पक्षनेतेपदाची निवड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारपासून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चा आणि त्यानंतर रविवारी सकाळी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. याच धर्तीवर विरोधी पक्षाची सर्व नेत्यांतडून प्रशंसाही करण्यात आली. परिणामी विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवडही रविवारीच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.