Devendra Fadnavis – अडीच वर्षात महाराष्ट्राने विकासाची गती धरली आहे. त्यामुळे आता त्याच गतीने महाराष्ट्र काम करेल आणि महाराष्ट्र नेहमी आग्रही राहील. आमचे रोल बदलले असले तरी, दिशा आणि गती तसेच समन्वय तोच राहील, कोणताही बदल राहणार नाही. मागच्या काळात मी आणि शिंदे आलो तेव्हा 50-50 चा सामना होता आणि जेव्हा अजित पवार आले तेव्हा 20-20 चा सामना सुरू झाला. पण आता टेस्ट सामना सुरू झाला असून गांभिर्याने आम्ही काम करणार आहोत. अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेणार असून ते पुढेही सुरू ठेवणार आहोत, असे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात आज 12 दिवसांनी महायुतीचे सरकार स्थापन झाले. आझाद मैदानावर आयोजित समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमची भूमिका बदलली असली तरी दिशा आणि गती तसेच समन्वय तोच राहील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. हे सरकार योग्य मार्ग काढत जनतेची कामे करेल. तसेच लाडकी बहीण योजना सुरू राहील आणि दरमहा महिलांना 2100 रुपये दिले जातील. पण लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करताना ज्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत, त्या महिलांचे सर्व निकष पाहिले जातील, त्यानंतर पैसे दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होणार आहे. मंत्रिमंडळाबाबत सर्व गोष्टी निश्चित झाल्या आहेत. काही खात्यांबाबतचा प्रश्न शिल्लक आहे. मात्र आम्ही एकत्र बसून त्यावर तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षाची निवड मुंबईच्या अधिवेशनात करणार आहोत. 9 डिसेंबरला ही निवड होईल. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल. तीन दिवसाचे विशेष अधिवेशन मुंबईत होईल. त्याची शिफारस राज्यपालांना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.