मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कोल्हापूरमधील शाहू प्रेमी जनतेने याचा निषेध करत फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी एक ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केले होते . यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही वेळातच संभाजीराजेंनी एक ट्विट केलं. ज्यात फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.