मुंबई – थोर साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या साहित्याचा गौरव म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस जगात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,’बुधवारी जेव्हा विधान परिषदेत मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर झालं त्यावेळी सभागृहात शांतता होती. त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल. हे सांगताना मला कुणाचा अपमान करायचा नाही असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.
ते पुढे म्हणाले,’मराठी भाषेचं काय होणार याची चिंता करण्याचं कारण नाही. मराठीचं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा विरोध नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूनही मराठीवर प्रेम करू शकतो. मराठी भाषा प्रचिन आहे का याचे आज पुरावे द्यावे लागतात हे दुर्दैवी आहे असंही त्यांनी सांगितलं.