मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन जळगावचे एसपी प्रविण मुंढे यांना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयकडून देण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. या प्रकरणात अनिल देशमुख यांचे ऑडिओ आणि व्हिज्युअल आपल्याकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की कशाप्रकारे गिरीश महाजनांवर मोक्का लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. हे गुन्हे दाखल करायला लावले. यासंदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी दिले होते, त्यावरच सीबीआयकडे केस झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासह कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणं ही मोडस ऑपरेंडी होती’, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिला इशारा
‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी नादी लागलं तर सोडत नाही. त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी मला त्यांचे ऑडिओ व्हिज्युएल आणून दिले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत? ते आमच्यावर जे आरोप लावतायत त्यासंदर्भात काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत. या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी अशाप्रकारचं राजकारण करत नाही. पण रोज जर कुणी खोटं बोलून याठिकाणी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी एवढच लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही’, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.