फडणवीस, राज ठाकरे यांच्या सुरक्षेत ‘कपात’; सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची ‘राळ’

मुंबई – विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संरक्षण काढून घेण्यात आले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हे बदल्याचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तर यामुळे जनतेत मिसळण्याच्या कार्यक्रमात कोणताही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले. ते ,म्हणाले, नेत्यांना असणाऱ्या भीतीच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षणाचा फेर आढावा घेतला जातो.

फडणवीस यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्याऐवजी, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येईल. फडणवीस यांच्या पत्नी अमृता आणि त्यांची कन्या दिविजा यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट दर्जाची सुरक्षा होती. ती आता एक्‍स दर्जाची करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना वाय प्लस ऐवजी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येईल.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना झेड ऐवजी वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्यात येईल. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. राणे यांना यापुर्वी वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्थ होती. या शिवाय राज्याचे लोकायुक्त एम. एल. तहिलिआनी यांची सुरक्षा व्यवस्था झेडवरून वाय दर्जाची करण्यात आली.

सरकारच्या अधिसुचनेनुसार 11 जणांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली. तर 16 जणअंची काढून घेण्यातभ आली. 13 जणांना नव्याने सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. त्यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि युवा सेनेचे सचिव आणि रश्‍मी ठाकरे यांचे भाचे वरूण सरदेसाई यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले केवळ वायरलेस सुरक्षा मिळणारआहे. त्यांना यापुर्वी वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार प्रसाद लाड, राम कदम आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांचीही सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आली.

कॉंग्रेसचा राजीनामा देणारे माजी शहराध्यक्ष कृपाशंकरसिंह, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची एक्‍स दर्जाची सुरक्षा काढण्यात आली. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा व्यवस्था वाढवून झेड दर्जाची करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांची सुरक्षा व्यवस्था वाढवून वाय प्लस विथ एस्कॉर्ट करण्यात आली. भाजपा नेते आशिष शेलार यांची सुरक्षा व्यवस्था वाय प्लस दर्जाची वरून वाय करण्यात आली.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा वाय प्लस विथ एस्कॉर्ट करण्यात आली. 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव करणारे आमदार वैभव नाईक यांना एक्‍स दर्जाची सुरक्षा देण्यात आली.

संदीपान भूमरे, सुनील केदार, दिलीप वळसे पाटील, अब्दुल सत्तार हे विद्यमान मंत्री, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली.

दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेत कपात करून राजकीय शत्रूत्व काढत आहे. त्यावरून सरकारची मानसिकता काय आहे, हे लक्षात येते. करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते. त्यावेळी फडणवीस राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. त्यांची सर्व सुरक्षा व्यववस्था कढून घेतली तरी ते राज्यातील लोकांचा आवाज बनण्यासाठी फिरतच राहतील, असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.

देशमुख म्हणाले, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाच ज्येष्ठ अधिकाऱ्यांची समिती काम करते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूरध्वनी करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यास सांगितले आहे. भाजपाच्या कार्यकाळात शरद पवार आणि अजित पवार यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली नव्हती.

नारायण राणे म्हणाले, दहशतवाद्यांकडून मला धोका असल्याने मला मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. माझी काही त्याबाबत तक्रार नाही. मला काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. सुधीर मनिगुंटीवार म्हणाले, माझी सुरक्षा व्यवस्था नक्षलींकडून असणाऱ्या धोक्‍यांमुळे दिली होती. ती काढून घेतल्याने नक्षलींचा धोका संपला असावा.

सुरक्षा व्यवस्था कशी असते?
झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत, बुलेटप्रुफ कार, एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, दोन एस्कॉर्ट वाहने, त्यात प्रत्येकी सहा हवालदार याशिवाय त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या सथळी दहा पोलिसांचा बंदोबस्त असतो. एकूण 22 कर्मचारी बंदोबस्तावर असतात. तर वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत 11 कर्मचारी तर एक्‍स दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.