मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याच्या एकीकडे चर्चा रंगत असतानाच आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखल सोबत होत्या. राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आज अचानक राज ठाकरे यांच्या घरी आले. ही कौटुंबीक भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात हे दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसत आहेत.
मुंबई महानगर पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
आज सकाळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर देखील भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.