देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

मुंबई – राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यातून राजकीय पुढारीही सुटले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली असून त्या रुग्णालयात दाखल आहेत. रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना त्यांची विचारपूस केली आहे.

रश्मी ठाकरे यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्या मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. मात्र उपचारासाठी त्या आता रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे ? अशी विचारपूस केली. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितलं. त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असं बोललं जात आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.