पुणे – भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अध्यक्ष असलेल्या बॅंकेची आज सरकारने चौकशी लावली. तुम्ही शंभर चौकश्या करा आम्हाला काही अडचण नाही. तुमच्या चौकश्यांनी हा दबणारा पक्ष नाही, असा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला इशारा दिला.
भारतीय जनता पार्टी, पुणे शहर यांच्या वतीमे पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पदवीधर मतदासंघ हा आपला असून, सलग दोनवेळा चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविला. पुण्यातील मतदान खूप महत्त्वाचे आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून घेतली.
आता सर्वाधिक मतदान करून घेण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. आपला विश्वासघात करून जे सरकार आले, ते आता मतदारांचाही विश्वासघात करत आहे. त्यामुळे मुठभर मावळे असलो तरी या सरकारचा पराभव करून विजय मिळवायचा आहे. भाजपची संपत्ती ही पैसा, बंगला नव्हे तर कार्यकर्ता आहे.