लवकरच होणार घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) – केंद्रिय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेना-भाजपा युतीची चिंता आम्हालाही आहे, असे अधोरेखीत करत युतीची घोषणा लवकरच करू, असे स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी केंद्र सरकारे घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याबद्दल अभिनंदन केले. विधानसभा निवडणूक, शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा व जागा वाटप या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही घोषणा करतील अशी पत्रकारांची अटकळ होती.
परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कॉर्पोरेट कर 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार असून रोजगार निर्मिती होईल. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला कसा होईल याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपल्यावर पत्रकारांनी महायुतीच्या संदर्भात प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर उत्तर देताना युतीची चिंता तुम्हाला जेवढी आहे तेवढीच चिंता मलाही आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
…तर मेट्रोची आर्थिक व्यवहारता धोक्यात येईल
आरेमधील कारशेड ऐवजी पर्यायी जागेचा आग्रह धरला जात आहे. पण मेट्रो कारशेडसाठी पर्यायी खासगी जागा विकत घेण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. जागा विकत घेतली तर मेट्रोची आर्थिक व्यवहार्यता संपुष्टात येईल. एक रुपया जरी जास्त खर्च केला तर वसूल कसा करणार, एवढे पैसे खर्च करून जागा विकत घेतली तर मेट्रोचे तिकिट दर मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल. त्याचा परिणाम मुंबईकरांवर होईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
कारशेडची जागा संरक्षित जंगल नाही
आरेतील नियोजित कार शेडची जागा ही पर्यावरणदृष्या संवेदनशील नाही, संरक्षित जंगलही नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, हरित लवाद व वृक्ष प्रधिकरण समितीनेही निर्णय दिला आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयावर काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आम्ही न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडू, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात माहिती दिली.