मी का शरद पवार बनू?- देवेंद्र फडणवीस

त्यांच्या राजकारणाचं युग आता समाप्त

मुंबई – मी का शरद पवार बनू? पवार पक्ष बनवण्याचे आणि पक्ष फोडण्याचे राजकारण करायचे. त्यांच्या राजकारणाचं युग आता समाप्त झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्यावर शनिवारी शरसंधान केले.

इंडिया टुडेने येथे आयोजित केलेल्या एका प्रश्‍नोत्तराच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. तुम्ही 21 व्या शतकाचे शरद पवार ठराल का, असा प्रश्‍न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, मी देवेंद्र फडणवीसच बनेल. पिढी बदलली आहे. पवार यांनी केले तसे राजकारण आता जनता स्वीकारत नाही.

आपण जसे राजकारण कराल; तसेच राजकारण पुढील काळात आपल्याबाबतही होईल. आज पवार यांच्या पक्षाची स्थिती पहा. हे काळचक्र आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर बोट ठेवले. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी साखर सम्राटांना नोटिसांची भीती दाखवली जाते, असा पवार यांचा आरोप आहे. त्याविषयी विचारल्यावर फडणवीस म्हणाले, पवार तसे राजकारण करायचे. त्यामुळे आम्ही तसेच करतो असे त्यांना वाटते. मात्र, त्यांच्या आणि आमच्या राजकारणात मोठा फरक आहे. त्यामुळेच नवी पिढी आमच्या बरोबर आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे आमचे राज्यातील पहिलेच सरकार आहे. विरोधक नुसतेच आरोप करतात. पण, पुरावे देऊ शकत नाहीत. मी विरोधी बाकांवर असताना पुराव्यानिशी आरोप करायचो. मात्र, तत्कालीन सरकारांकडून त्यावर कुठली कारवाई केली जात नव्हती, अशी टीकाही फडणवीस यांनी पुढे बोलताना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.