दुसऱ्या टप्यातील महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप

अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा

सोलापूर (प्रतिनिधी) – सरकारच्या काळातील विकासकामांची माहिती नागरिकांना सांगण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महाजनादेश यात्रा सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी होणार आहे. यानिमित्त पुुणे नाका ते पार्क स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या समारोपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत.

ही यात्रा 22 ऑगस्टला धुळे, नंदूरबारपासून सुरू झाली. यादरम्यान 33 सभा, 1 रोड शो, 9 पत्रकार परिषदा झाल्या. एकूण 1884 किमी अंतर असून, 50 विधानसभा मतदार संघाचा यात्रा मार्गात समावेश होता, अशी माहिती भाजप संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात्रा उस्मानाबादमार्गे सोलापुरात येणार आहे. जुना पुणे नाका येथे स्वागत होईल. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याप्रसंगी दुतर्फा वारकरी, महिला, गणेश मंडळाचे कार्यकर्ते उभे राहून यात्रेचे स्वागत करतील. मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री उपस्थित राहतील.

दरम्यान, यात्रेच्या पहिल्या टप्प्यात उद्‌घाटनासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दुसऱ्या टप्प्याच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तिसऱ्या टप्प्याच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असे तीन दिग्गज नेते येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.