आता भाजपमध्ये नो व्हॅकन्सी: देवेंद्र फडणवीस

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

अमरावती – आता भाजप कोणाच्याही मागे फिरत नाही. वेगवेगळे नेते, पुढारी आमच्या मागे फिरतात आणि प्रवेश द्या, अशी विनंती करतात. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो. बाकीच्यांना हाऊसफुल्ल असल्याचे सांगतो असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच दुष्काळाशी हात करण्यासाठी पुढची पाच वर्षे घालवायची असून पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा निर्धार त्यांना यावेळी व्यक्त केला.

युती 250 जागा जिंकेल – राजनाथ सिंह
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र नंतर शिवसेनेसोबत युती झाली आणि फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचे सरकार चालवले. यावेळी दोन्ही पक्ष एकत्रीत विधानसभा निवडणूक लढणार असल्याने दोनशे प्लस नव्हे तर 250पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथून जनयात्रेला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या सरकारने 15 वर्षात केले नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही करुन दाखवले, असा दावा त्यांनी केला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, जनता हीच आमची राजा आहे. जनता आमचं दैवत आहे. आम्ही मालक नसून सेवक आहोत. आपण केलेली कामे जनतेकडे जाऊन सांगायची आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. पुन्हा एकदा जनादेश घेऊन येणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला.

पाच वर्षांत सर्व समस्या आम्ही संपवल्या असा दावा करणार नाही, पण गेल्या सरकारने 15 वर्षात केले नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही करुन दाखवले आहे. याबाबत कोणत्याही व्यासपीठावर येऊन चर्चा करायला आपण तयार आहोत, असे खुले आव्हान विरोधकांना दिले. जर आपला पराभव झाला तर जनादेश घेण्यासाठी बाहेर पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पैसा विदर्भाच्या नावे घ्यायचा आणि आपल्या खिशात टाकायचा अशी अवस्था होती. पण पाच वर्षांत विदर्भातील दीड लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्‍शन दिले. युतीच्या सरकारने उद्योग आणले, 30 हजार किमीचे रस्ते बांधले. आजपर्यंत कोणी करुन दाखवले नाही पण या महाराष्ट्र सरकारने करुन दाखवले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्राचा शिक्षणातला क्रमांक 18 वा होता, फक्त तीन वर्षांत देशावर तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. येत्या काळात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.