नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवारी) दिल्लीत दाखल झाले आहे. पवार यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील आहेत. प्राप्त माहितीनुसार शरद पवार यांनी मुंबईतील आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्ली गाठली आहे.
पवार दिल्लीत दाखल झाले असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील दिल्लीत असल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटणार असल्याचं समजतंय. तर शरद पवार हे विरोधकांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला गेले असल्याचे देखील सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीतून समजते.
दरम्यान, दिल्ली येथे असणाऱ्या देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी भजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील व अमित शहा यांच्यामध्ये देखील भेट झाल्याची माहिती मिळाली आहे.
नारायण राणेंचा दावा
दरम्यान, आज (शुक्रवारी) माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे सरकार येत्या मार्च महिन्यामध्ये पडणार असल्याचे भाकीत केले. तसेच राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा देखील दावा केला.