Devendra Fadanvis : अखेरची संधी ! आता एकही प्रकार खपवून घेणार नाही; फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

मुंबई : वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच. आता एकही प्रकार खपवून घेणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला. तसेच त्यांनी सर्व मंत्र्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनिटे मंत्र्यांचा क्लास घेतला. यावेळी फडणवीस यांनी कानउघाडणी केली.
सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या बॅगेत पैसे असल्याचे दिसत होते. त्यानंतर विधानसभेच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. या पाठोपाठ कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. यापैकी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण सर्वाधिक गाजले.
विधिमंडळात कायदा आणि सुव्यवस्था, राज्याचा विकास याबाबत महत्त्वाचे कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे ऑनलाइन रमीचा जुगार खेळताना दिसले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याआधाही कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकार भिकारी आहे, असेही एक विधान केले. संजय शिरसाट यांच्या बेडरुममध्ये पैशांनी भरलेली कथित बॅग असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सरकार बॅकफुटवर गेल्याचे दिसून आले.





