मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता, उपमुख्यमंत्री अन् पुन्हा मुख्यमंत्री! फडणवीसांनी चक्रव्यूव्ह भेदलंच…

Devendra Fadanvis CM – विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र प्रचंड बहुमत असताना देखील महायुतीने मुख्यमंत्री ठरवण्यासाठी तब्बल ५ दिवसांचा अवधी घेतला. गुरुवारी रात्री दिल्ली येथे अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
२०१४ ते २०१९ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर अडीच वर्ष विरोधीपक्ष नेता तर अडीच वर्ष उपमुख्यमंत्रीपदावर काम करावे लागले. त्यांच्यासाठी हा काळ आव्हानात्मक होता, मात्र स्वतःला आधुनिक अभिमन्यू संबोधणाऱ्या फडणवीसांनी हे चक्रव्यूव्ह भेदून दाखवलेच.
२०१९ विधानसभा निवडणुका आणि राजकीय उलथापालथ | Devendra Fadanvis CM
२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा राज्यातील जनतेने युती सरकारला कौल दिला. भाजप शिवसेना आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने फडणवीस यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.
मात्र राज्यात रंगलेल्या राजकीय नाट्याने सगळं चित्रच बदललं. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला, भाजपने तो मान्य केला नाही. अखेर विरोधी विचारधारा असलेले शिवसेना – राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली राज्यात सुरु झाल्या.
शिवसेनेच्या हालचाली पाहून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत हातमिळवणी केली. घाईघाईत भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सरकारही स्थापन केले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, हे सरकार केवळ ८० तासच टिकू शकले.
शरद पवारांनी राजकीय डावपेच टाकत आधी अजित पवारांचे समर्थक आमदार आपल्या बाजूने खेचले आणि नंतर अजित पवारांना देखील परत बोलावत हे सरकार पाडलं. शरद पवारांनी डावपेच हणून पाडल्याने हा पराभव फडणवीसांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर, युतीला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. सगळ्यांना वाटलं की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं. उद्धव ठाकरेंच्या गटाला बाजूला सारून शिवसेनेवर पकड मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं, पण त्यांनी ही भूमिका स्वीकारली.
जोरदार पुनरागमन | Devendra Fadanvis CM
२०१९ च्या राजकीय नाट्यानंतर फडणवीसांसाठी आणखी एक मोठं आव्हान आलं ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत. भाजपच्या जागा महाराष्ट्रात २३ वरून थेट ९ वर घसरल्या. राज्यात भाजपची पकड कमजोर झाली, आणि फडणवीसांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मात्र फडणवीस पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले. प्रचार यंत्रणेपासून विरोधकांना प्रत्युत्तर आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला.
त्यांचा हा प्रयत्न २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत फळाला आला. भाजपने या निवडणुकांमध्ये केवळ विक्रमी जागाच जिंकल्या नाहीत, तर महाराष्ट्रात पक्षाची ताकदही दाखवून दिली.
नागपूर ते महाराष्ट्राचा चेहरा | Devendra Fadanvis CM
फडणवीसांचा राजकीय प्रवास नागपूरपासून सुरू झाला. वयाच्या २७व्या वर्षी ते नागपूरचे महापौर झाले. संघाशी असलेल्या दृढ संबंधांमुळे भाजपमध्ये त्यांना चांगल्या संधी मिळाल्या. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, चार दशकांनंतर राज्याला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री फडणवीसांच्या रूपाने मिळाला
मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या या कार्यकाळात, मुंबई मेट्रो प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना यांची विशेष चर्चा झाली. या काळात शहरी मतदारांवर विशेष पकड मिळवण्यातही ते यशस्वी ठरले.
देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत फडणवीसांनी चक्रव्यूव्ह भेदलंच. | Devendra Fadanvis CM





