नवी दिल्ली – जम्मू काश्मीर पोलिस दलाचा निलंबीत डीएसपी देवेंदरसिंग याच्यावर त्याच्या पाकिस्तानी हॅंडलर्सनी भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयातही संपर्क प्रस्थापित करण्याची जबाबदारी सोपवली होती असा दावा एनआयएने त्याच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
देवेंदरसिंग याने हिज्बुल मुजाहिदीनशी संधान साधून दहशतवाद्यांना मदत केल्याचा मुख्य आरोप आहे. या प्रकरणी एनआयएने त्याच्यावर 3064 पानांचे आरोपपत्रही कोर्टात सादर केले आहे.
देवेंदरसिंग याने दहशतवाद्यांना नेमक्या कशा पद्धतीने मदत केली आणि तो त्याच्या पाकिस्तानी हॅंडलरशी कशा प्रकारे संबंधीत होता याचा सारा तपशील या आरोपपत्रात देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरात कार्यरत असलेल्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला तो मदत करीत होता व त्यांच्या दहशतवाद्यांना पोलिसांच्या गाडीतून ने-आण करण्याचे कामही तो करीत असे. त्याने ही सारे कामे केल्यानंतर त्याला भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयामध्येही संबंध प्रस्थापित करण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्याला यात फार प्रगती करता आली नाही असेही एनआयएने म्हटले आहे.
पाकिस्तान स्थिती दहशतवादी संघटनांच्या मदतीने भारताच्या विरोधात युद्ध पुकारल्याच्या कारणावरून त्याच्यावर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. देवेंदरसिंग याच्या फोन कॉन्टॅक्ट मध्ये पाकिस्तानातील अनेक अधिकाऱ्यांची नावे सापडली आहेत. त्याला 11 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे.