शेवगाव – आपल्या राजकीय प्रवासात कधीच व्यक्ती व्देषाचे व जातीपातीचे राजकारण केले नाही. पक्षाने दिलेली संधी सर्वसामान्य जनतेच्या सेवेची पर्वणी समजून काम केले. त्यामुळे कोणावरही टीकाटिपणी करून मते मागणार नाही. १० वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर केलेली विकासकामे हेच आपले भांडवल आहे, असे प्रतिपादन भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील स्वयंभू निदि्स्त गणपती मंदिरात राजळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केशव महाराज गुजर यांच्यासह अनेक हितचिंतकांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आ.राजळे बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, राहुल राजळे, विष्णुपंत अकोलकर, भिमराज सागडे, उध्दव वाघ, रामकिसन काकडे, सुभाष बर्डे, आशा गरड, मिना कळकुंबे, सोमनाथ कळमकर, शशिकांत खरात आदीसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. आ. राजळे म्हणाल्या, मतदारसंघातील आवश्यक कामावर आपण भर दिला असून, गावागावांतील कामे आपल्यासमोर आहेत. कार्यकर्त्यांनी घरोघर जावून त्याचे मतदारांना स्मरण करून द्यावे.
शासनांच्या विविध लाभार्थ्यांपर्यंत जावून त्यांना सरकारचे योगदान सांगा. गावनिहाय व बुथनिहाय मतदानाची टक्केवारी वाढवावी. आपसातील गटतट हेवेदावे बाजूला ठेवून स्वत: उमेदवार आहोत, असे समजून कामाला लागा. आपआपली गावे सांभाळा, कोणाही कार्यकर्त्यांना विरोध किंवा त्रास झाला तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. उर्वरित अनेक प्रश्न आपल्याला पुढील काळात हाताळायचे असल्याचे सांगितले.
माजी प्राचार्य रामनाथ काकडे, उमेश भालसिंग, कांबीचे सरपंच सुनिल रजपूत, बापू धनवडे, कासम शेख, आकाक्ष लव्हाट, बापूसाहेब पाटेकर, गंगा खेडकर, दिनेश लव्हाट, अशोक खिळे, राम केसभट, जलील राजे, हातगावचे दत्ता भराट ,रासपचे बाजीराव लेंडाळ आदींची भाषणे झाली.