जाधववाडी, (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या वेगाने पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सक्षम आहे.
मात्र, सर्व समस्या एकाच वेळत सुटणार नाहीत. त्यासाठी प्रशासनाला वेळ द्यावा लागेल. सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याबाबत आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने ‘‘संवाद सोसायटीधारकांचा’’ हा कार्यक्रम उत्साहात झाला.
यावेळी महानगरपालिका व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सोसायटीधारकांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. या कार्यक्रमात सुमारे अडीच हजार सोसायटीधारक सहभागी झाले होते.
यावेळी आमदार महेश लांडगे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता मकरंद निकम, तसेच, पोलीस प्रशासनाकडून भारतीय पोलीस सेवेतील डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी केले. अमोल देशपांडे यांनी शहराच्या विकासाच्या वाटचालीबाबत सादरीकरण केले.
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात सोसायट्या स्थापन होत आहेत. या सोसायट्या स्थापन झाल्यानंतर सोसायटीधारकांचे अनेक प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आवश्यक होते.
त्यासाठी २०१६ साली पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची स्थापना करण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन काम करीत आहे. सोसायटी फेडरेशनच्या अंतर्गत १३६७ सोसायट्या नोंदणीकृत झाल्या आहेत, ज्यात जवळपास ४० हजार फ्लॅट्सचा समावेश आहे.
संवाद सोसासायटीधारकांचा कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे :
प्राधिकरण हद्दीतील प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्याबाबत निवडणूक आचारसंहीतेपूर्वी निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
सोसायटीधारकांच्या मागणीप्रमाणे समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करण्यात येईल. सोसायटीच्या आवारात वाईन शॉप अथवा दारु दुकानाला परवानगी देवू नये, याबाबत पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, बेकायदा पार्किंग समस्या सोडवण्यासाठी वॉर्डनची संख्या वाढवण्यात येईल. बांधकाम परवानगी देताना पूर्व तपासणी करावी.
पब्लिक स्पेस, ॲमिनिटीज्, ओपन स्पेस, पार्किंग याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी करावी. सोसायटीधारकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्याबाबत यावेळी संकल्प करण्यात आला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील सोसायटीधारकांच्या असणाऱ्या ज्वलंत नागरी समस्या पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे प्रशासन आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यासमोर मांडून त्या सोडवण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे.
सदर संवादामध्ये मांडलेल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल आणि सर्व समस्या प्रशासनाशी समन्वय साधून सोडवल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. – संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी- चऱ्होली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.
महानगरपालिका लवकरच शहरातील खड्डे आणि खड्डे बुजवणार आहे. सोसायटीधारकांच्या तक्रारीनुसार अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील. पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत.
मात्र, शहरात दरडोई पाण्याचा वापर जास्त आहे. त्यामुळे पाण्याची बचत आणि अपव्यय टाळण्यावरही पिंपरी-चिंचवडकरांनी भर दिला पाहिजे.
‘सोसायटीधारकांचा संवाद’ हा उपक्रम स्तुत्य आहे. तीन ते चार महिन्यांतून एकदा असा ‘संवाद’ व्हावा. या करिता आम्ही भविष्यात प्रयत्नशील राहणार आहोत. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.