क्षेपणास्त्र हल्ल्यापासून जहाजांचे रक्षण करणारे तंत्रज्ञान विकसित

नवी दिल्ली – शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्‌यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात “डीआरडीओ’ने विकसित केले आहे. “डीआरडीओ’च्या जोधपुर इथल्या संरक्षण प्रयोगशाळेने या महत्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. भारतीय लष्कराच्या गुणात्मक आवश्‍यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लघु पल्ला चॅफ रॉकेट, मध्यम पल्ला चॅफ रॉकेट, दीर्घ पल्ला चॅफ रॉकेट विकसित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाने या तीनही प्रकारांच्या अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर नुकत्याच चाचण्या घेतल्या असून या संदर्भातली कामगिरी समाधानकारक आढळली आहे.

शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते यातच याचे महत्व आहे.

भविष्यातल्या धोक्‍यांना तोंड देण्यासाठी “डीआरडीओ’चे हे तंत्रज्ञान मोलाचे ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उद्योगांना पुरवण्यात येत आहे. या कामगिरीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी “डीआरडीओ’, भारतीय नौदल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे.
भारतीय नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे हे महत्वाचे तंत्रज्ञान स्वदेशात विकसित करणाऱ्या चमूच्या प्रयत्नाची “डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी प्रशंसा केली आहे. धोरणात्मक दृष्ट्‌या महत्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात विकसित करून मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मोकळे केल्याबद्दल व्हाईस एडमिरल जी अशोक कुमार यांनी “डीआरडीओ’च्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.