श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. श्रावण महिन्यात महिला वर्ग आवर्जून श्रावणी सोमवार पाळतात. शिवालयांमध्ये जाऊन भाविक श्री शंकराचे दर्शन घेतात. तथापि, सध्या लॉकडाऊन असल्याने मंदिरे भाविकांसाठी खुली झालेली नाहीत. राज्यभरात आणि पुणे जिल्ह्यात विविध शिवमंदिरे आहेत. त्यांची माहिती देणारे सदर खास “दै. प्रभात’च्या वाचकांसाठी आजपासून सुरू करीत आहोत.
श्री परशुरामांची पावनभूमी म्हणजेच कोकण. या भूमीच्या पश्चिमेला अथांग सिंधुसागर आणि पूर्वेला उत्तुंग सह्याद्री आहे. खळखळणाऱ्या सरिता, नीलगगनाशी गूजगोष्टी करणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा, रसाळ आंबे, काजू फणसांच्या राया, रुपेरी वाळूचे सागरकिनारे आणि प्रेक्षणीय ऐतिहासिक मंदिरांची ही सुंदर भूमी आहे. इथे सह्याद्रीच्या कुशीत प्रतिकैलास म्हणून वर्णावे, असे श्रीक्षेत्र मार्लेश्वर हे महादेवाचे जागृत देवस्थान आहे.
“सह्याद्री पर्वती धाम तुझे, श्री मार्लेश्वरी क्षेत्र पवित्र गाजे.. इथे भक्त येती, तुझ्या दर्शनाला, नमस्कार माझा मार्लेश्वराला, हर हर मार्लेश्वर हाच मंत्र, भक्तासाठी ठावे तुझे हेचि तंत्र, गिरी गुहेतून ध्वनी उमटला, नमस्कार माझा मार्लेश्वराला..’
असा महिमा शिवभक्त गातात. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळ हे प्राचीन देवस्थान आहे. पर्वतरांगातून वाहणारी बावनदी, हिरव्या लतावेली, रान पाखरे मन मोहून घेतात. मारळपासून सह्यगिरीच्या कुशीत जाणारी ही नागमोडी पायवाट मंदिराजवळ पोहचते. समोरच धारेश्वर धबधबा धीरगंभीर नाद करीत कोसळतो. भाविक स्नान करून मगच गुहेतील शिवमंदिरात प्रवेश करतात.
पांडवांनी वनवासात ही गुहा कोरली आहे. स्फटिकजलाने भरलेली कुंडे आहेत. गुहेत नागराज मुक्त संचार करताना दिसतात. ओमकाराचा नाद घुमत असतो. स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होते.
“महाशिवरात्री त्रिपुरापूनव जाण, मकर संक्रांती करावे शिवदर्शन, पुण्यथोर असे महिमान, पवित्र देवस्थान पावन हे..’, असा या स्थानाचा महिमा आहे.
– माधुरी शिवाजी विधाटे