तिरुअनंतपुरम – ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून अठराव्या शतकात हालअपेष्टा सहन कराव्या
लागून मृत्यू आलेल्या देवसहायम पिल्लई यांना 15 मे 2022 रोजी संतपद बहाल करण्यात
येणार असल्याचे व्हॅटिकनने जाहीर केले आहे. पिल्लई यांनी मरणोत्तर संतपद देण्याचा निर्णय
21 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आला असला तरी ते बहाल करण्याचा कार्यक्रम मे
2022 मध्ये होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
पिल्लई यांचे मूळचे नाव नीलकंद पिल्लई असे होते. हिंदू धर्मातील नायर कुटुंबात त्यांचा 23 एप्रिल 1712 रोजी जन्म झाला होता. नायर कुटुंब त्यावेळी तिरुवित्तमकूर साम्राज्याचा भाग असलेल्या मार्थंडम जवळील नत्तलाम येथे वास्तव्याला होते.
17 मे 1745 रोजी पिल्लई यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. पिल्लई हे राजा मार्तंड वर्माच्या राजवाड्यातील कर्मचारी होते. राज्याच्या कामाच्या निमित्ताने त्यांचा अनेक डच अधिकाऱ्यांशी संबंध येत असे. त्यामध्ये डी लेनॉय या अधिकाऱ्याचाही समावेश होता.
कोलाशेल येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत राजा मार्तंड वर्माने डी लेनॉयला जिवंत पकडले होते. असे सांगितले जाते की, डी लेनॉय याच्याशी असलेल्या संबंधांमुळेच पिल्लई यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यामुळे राज्यातील प्रशासन व अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर देशद्रोह आणि अन्य गंभीर आरोप लावले. शेवटी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगातच 14 जानेवारी 1752 रोजी त्यांचीगोळ्या झाडून हत्या करण्यात आली असे सांगितले जाते.
आता व्हॅटिकन येथे 15 मे 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात अन्य चारजणांबरोबर पिल्लई
यांना संतपद बहाल करण्यात आल्याची घोषणा होणार आहे.