लोणी काळभोर- बॅन्कॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत कदमवाक वस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील देवयानी शिवाजी ननवरे हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. देवयानी ही श्रुतिका चौधरी यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची कन्या आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतासह अनेक देशांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
देवयानी ननवरे हिस कनिष्ठ गटामध्ये यश मिळाले. देवयानी एंजल स्कूल, कदमवाक वस्ती येथे इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे. या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, ओम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, प्राचार्य फरशीद इराणी, व्यवस्थापिका त्रिवेणी घाटे यांनी देवयानीचे अभिनंदन केले.