खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही
रेडा -इंदापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर शहरात अद्ययावत पत्रकार भवन उभारण्यासाठी व यासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात पूर्ण सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना इंदापूर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, सचिव सागर शिंदे यांच्या हस्ते नियोजित पत्रकार भवन उभारणीसाठी तसेच पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसंदर्भात लेखी निवेदन यांना देण्यात आले.
त्यावेळी सुळे बोलत होत्या. इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका शाखेला शासनाकडून जागा तसेच पत्रकारांना सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ जागेसंदर्भात पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही माहिती खासदार सुळे यांनी दिली. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी इंदापूर येथे अद्ययावत पत्रकार भवन उभारण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधीची मागणी केली आहे. त्यामुळे पत्रकार भवन उभे राहील, अशी माहिती बांधकाम राज्यमंत्री भरणे यांनी दिली.