योजनांचे उद्दिष्ट निश्‍चित करा, मगच त्या राबवा

उपसभापतींच्या पशुसंवर्धनाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना; महावितरणाच्या अधिकाऱ्यांची “दांडी’

“महावितरण’चे अधिकारी गैरहजर

गेल्या काही दिवसांपूर्वी काले, ता. कराड येथे महावितरणच्या दुर्लक्षामुळे एका महिलेचा शॉक लागून शेतामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेसह कराड तालुक्‍यात बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. तारा लोंबकळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. आज या पंचायत समिती सभेमध्ये यावर अपेक्षित तोडगा निघाला असता. मात्र, सभेदिवशीच कोल्हापूरच्या मिटींगचे कारण सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सभेला दांडी मारली.

कराड  – तालुक्‍यात पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांची माहिती पंचायत समिती सदस्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार सदस्यांनी सभागृहात केली. त्यावरून पशुसंवर्धन विभागाच्या गलथान कारभाराबाबत सभेत जोरदार चर्चा झाली. यावेळी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या उद्दिष्टपूर्ती बाबत माहिती मिळत नसल्याचे सांगत शासनाकडून आधी योजनांची उद्दिष्ट मागवून घ्या, अन्यथा योजना राबवू नका, अशा सक्त सूचना बुधवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत उपसभापती सुहास बोराटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या सभेत विविध विभागांच्या आढाव्या दरम्यान जोरदार चर्चा करण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून तालुक्‍यात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची पैदास यासह साथीच्या रोगाचा फैलाव होण्याची शक्‍यता सदस्यांनी वर्तवली. यावर आरोग्य विभागाकडून सकल भागात साचलेले पाणी प्रवाहित करून त्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कृषी विभागाचा आढावा मांडताना तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात म्हणाले, 25 दिवसांच्या आकडेवारीनुसार प्रत्येक वर्षीच्या सरासरीच्या 150 टक्के पाऊस पडला आहे. कराड तालुक्‍यात आतापर्यंत 465 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करावे लागणार आहेत.कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा सादर करताना खरात यांनी सध्या तालुक्‍यात सुरु असणाऱ्या पावसाच्या परिस्थितीची माहिती दिली. यावेळी खरात यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत तालुक्‍यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास संभाव्य नुकसानाचे पंचमाने करण्यास सुरुवात केली जाईल. प्राथमिक अहवालानुसार आतापर्यंत 35 टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याची शक्‍यता आहे. यावेळी चंद्रकांत मदने यांनी उसाच्या लहान रोपांचेही मोठे नुकसान झाले असल्याने त्यांचेही पंचनामे करुन संबंधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. यावेळी अनेक सदस्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्यापूर्वी सदस्यांना त्याबाबत पूर्वकल्पना देण्याची सूचना केली. ज्वारी आणि मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे त्याबाबत औषध फवारणी करण्यासाठी आवश्‍यक ते प्रिस्क्रीप्शन देत असल्याचीही माहिती कृषी अधिकारी खरात यांनी दिली.

शेतकरी गटांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रकल्प उभारता येतात. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षकांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी सांगितले की, पावसाळी वातावरणामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये डेंग्यूसदृष्य साथीचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभाग तसेच वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने साथ रोग प्रतिबंधक उपाययोजना अवलंबण्यास सुरुवात झाली आहे.

शहरी तसेच ग्रामीण विभागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्‍यतो टाळावे. जावेच लागले तर तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधावा. घराच्या परिसरात पाण्याची डबकी साचू देउ नयेत. सात दिवसांपेक्षा अधिक जुने पाणी वापरु नये, असे आवाहनही केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचा केवळ दिखावा न करता प्रत्यक्ष जाउन किती झाडे जगतात. याची पाहणी करावी, अशी मागणी प्रणव ताटे यांनी केली. पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत शरद पोळ यांनी प्रश्न उपस्थित केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.