शासनादेशाला राज्यातील शाळांचा खो

पुणे – राज्य शासनाच्या शाळासिद्धी कार्यक्रमाअंतर्गत शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी राज्यातील 5 हजार 882 शाळांनी अद्यापही शासनाच्या आदेशाचे पालनच केले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

शाळांची गुणवत्ता आश्‍वासित करणे अत्यंत महत्त्वाचे असून शैक्षणिक, भौतिक, संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिद्धी हा कार्यक्रम राज्यात सुरू केलेला आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक वर्षी 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यांकन करावयाचे आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र शासनाच्या “निपा’ हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. शाळांनी या पोर्टलवर आपली सन 2018-19 ची माहिती पूर्ण भरणे आवश्‍यक आहे. मराठी माध्यमातून शाळासिद्धी पुस्तिकाही उपलब्ध आहे.

दि.30 जुलै पर्यंत शाळांनी स्वयंमूल्यांकन करुन घ्यावे, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालिका वंदना कृष्णा यांनी दिल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनी या सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. राज्यात 1 लाख 9 हजार 141 शाळा आहेत. यातील 99 हजार 530 शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण झाले असून 3 हजार 729 शाळांची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित शाळांनी अद्याप स्वयंमूल्यांकनासाठी सुरुवातच केलेली नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक एकूण 7 हजार 241 शाळा आहेत. यातील 6 हजार 212 शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण झाले आहे. 418 शाळांची प्रक्रिया सुरू आहे. तर 611 शाळांनी आजतागायत स्वयंमूल्यांकनासाठी पुढाकारच घेतला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.