सुपरमॉम दंगलगर्ल गीता फोगटचा निर्धार
नवी दिल्ली – करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे गेल्याने सरावासाठी जास्त वेळ मिळाला आहे. या स्पर्धेत पदक जिंकण्याचे एकमेव लक्ष्य असून लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करणारच, असा निर्धार दंगलगर्ल सुपरमॉम गीता फोगट हिने व्यक्त केला आहे.
देशासाठी खेळायचे ही जिद्द लहानपणापासून पाहिली होती. मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर व घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मला कुस्तीसाठी सातत्याने प्रोत्साहन मिळाले. माझ्या कुटुंबीयांनी माझ्या खेळातील कामगिरीसाठी खूप काही भोगले आहे. माझा आयुष्याचा जोडीदारही एक अव्वल कुस्तीपटू आहे त्यामुळे मी स्वतःला खूपच नशीबवान समजते की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कुटुंब मला लाभले. आता जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून देणे हेच एकमेव लक्ष्य माझ्यासमोर आहे, अशा शब्दांत गीताने आपल्या भावना व्यक्त केल्या.
2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होता आले. मात्र, त्या स्पर्धेत पदकापासून वंचित राहावे लागल्याची आजही खंत वाटते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळवले तेव्हाच पण केला होता की देशाला ऑलिम्पिकचे पदक मिळवून द्यायचे. अर्थात, त्यानंतरच्या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. त्यात खेळण्याची संधी मिळाली असती तर त्यावेळी माझ्याकडून अव्वल कामगिरी झाली असती. गेल्या चार मोसमात मला सातत्य टिकविण्यात जरी यश आलेले नसले तरीही आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारच, असा निर्धारही गीताने व्यक्त केला.
फ्री-स्टाईल प्रकारात मला गेल्या काही स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करता आली मात्र, त्यात मी समाधानी नाही. मला यापेक्षाही जास्त यश देशाला मिळवून द्यायचे आहे. आता माझे वय 31 असून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा माझ्या कारकिर्दीतील अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा ठरेल. आता करोनामुळे देशांतर्गत स्पर्धा केव्हापासून सुरू होतील हेदेखील सांगता येत नाही. मात्र, जेव्हा स्पर्धा सुरू होतील तेव्हा पूर्ण क्षमतेने खेळ करून ऑलिम्पिकची तयारी करण्याची चांगली संधी मिळेल, असेही गिताने सांगितले.
वैयक्तिक सरावाची संधी उपयुक्त…
करोनाच्या धोक्यामुळे सध्या सराव करण्यावर खूप बंधने येत आहेत. तसेच क्रीडा संकुलांना परवानगी दिली असली तरीही प्रशिक्षक व तंदुरुस्ती सल्लागार यांच्यासह कुस्तीचा सराव करता येत नाही. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे लागत आहे. मात्र, वैयक्तिक सराव करता येत असल्याने समाधानी आहे. येत्या काळात करोनाचा धोका संपुष्टात आला तर परिस्थिती बदलेल व खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात उतरता येईल, असेही मत तिने व्यक्त केले.