चुकीच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात निर्धार

शिक्रापूर येथे बैठक; शिरूर तहसीलवर धरणग्रस्त शुक्रवारी धडकणार

शिक्रापूर – शिरूर तालुक्‍यातील गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्‍न सतावत असून पुणे जिल्ह्यातील सात धरण प्रकल्पग्रस्तांच्या अनियमित जमीन वाटपातील शेकडो प्रकरणांच्या न्यायासाठी एकत्र येत लढा उभारत आहेत. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन शिरूर तहसील कार्यालय येथे पंधरा नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे, डॉ. धनंजय खेडकर यांनी दिली आहे.

शिक्रापूर येथील एका जमिनीच्या प्रकरणात लढाईमध्ये उतरलेले डॉ. धनंजय नामदेव खेडकर यांच्या पुढाकारामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पतंजली योग समिती, शेतकरी संघटना, क्रांतिवीर प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन लढा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची पहिली बैठक घेत लढ्याची दिशा ठरविण्यात आली आहे. यावेळी शिक्रापूर, जातेगाव बुद्रुक, धानोरे, जातेगाव खुर्द, कोंढापुरी, कासारी, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, कोरेगाव भीमा, खंडाळे, गणेगाव खालसा, डिंग्रजवाडी, राउतवाडी, बुरुंजवाडी यांसह आदी गावांतील शंभरहून अधिक अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांचे निवेदन शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना देत त्या ठिकाणीच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. खेडकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वीर, भामा आसखेड, उजनी, टेमघर, गुंजवणी, कळमोडी, चासकमान या सात धरणांच्या प्रकल्पग्रस्तांसाठी शिरूर तालुक्‍यात एकट्या चासकमान लाभक्षेत्रातील जमिनीचे सुमारे 3 हजार 568 हेक्‍टर क्षेत्रांचे संपादन करून त्यातील काही क्षेत्राचे वाटप करण्यात आले. वाटप झालेल्या क्षेत्राबाबत अनेक शेतकऱ्यांच्या पश्‍चात ही वाटप प्रक्रिया झाली आहे. अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनींचे वाटप केलेले असून जिल्हा पुनर्वसन अधिकारी कायद्याचे पालन न करता काही दलालांना हाताशी धरून जमिनींचे वाटप करत असल्यामुळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
– कैलास नरके, शिरूर- हवेली अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)