चीनमधील तपास अधिकाऱ्यांनी लढवली अजब शक्कल
बीजिंग : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास कसा करायचा याबाबत तपास अधिकारी विविध प्रकारचा विचार करत असतात. चीनमधील तपास अधिकाऱ्यांनी एका चोरीचा शोध घेण्यासाठी एक अजब असे तंत्रज्ञान वापरले आहे. ज्या ठिकाणी चोरी झाली होती त्या ठिकाणी सापडलेल्या एका मेलेल्या डासाच्या शरीरातील रक्ताच्या डीएनएच्या आधारे अधिकाऱ्यांनी चोराला शोधले आहे.
चोरी करण्यासाठी चोर या घरात घुसला होता तेव्हा त्या घरात कोणीच नव्हते, त्यामुळे या चोराने घरातच मुक्काम केला होता. तेव्हा त्या घरातील डास त्याला त्रास देत होते आणि अनेक डास त्याला चावले पण होते तेव्हा त्याने काही उपायांचा अवलंब करून डासांना पिटाळण्याचा प्रयत्न केला होता आणि हातानेही डास मारले होते.
असे काही मेलेले डास तपास अधिकाऱ्यांना घरात सापडले, त्या डासांच्या शरीरातील रक्ताचा अभ्यास करून त्यात त्यांना जे डीएनए नमुने सापडले. त्या डीएनएचे नमुने त्यांनी त्यांच्याकडील रेकॉर्डशी तपासून घेतले. तेव्हा तो नमुना रेकॉर्ड मधील एका गुन्हेगाराला मॅच होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्या आधारे त्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या चीनमधील फुजियन प्रांतातील पुजो या शहरात ही घटना घडली असून मॉर्निंग पोस्ट या नियतकालिकाने ती प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांना या चोरीचा शोध घेण्यास 19 दिवस लागले ज्याप्रकारे पोलीस चोरापर्यंत पोहोचले त्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडला.चोराने ज्या डासांना मारले होते त्या डासांनी अखेर बदला घेतला अशा प्रकारच्या काही मिश्कील प्रतिक्रियाही सोशल मीडियावर प्रसारित झाल्या. चोराला चोरीच करायची होती तर त्या घरात राहण्याचे कारण काय होते चोरी करून जर तो निघून गेला असता तर त्याला डास चावले नसते आणि तो सापडला नसता, अशी पण एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. यानिमित्ताने चीनमधील तपास अधिकाऱ्यांनी तपासासाठी एका वेगळ्या तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याचे मात्र समोर आले आहे.