बनावट नोटा तयार करणारा तरुण अटकेत

11 हजार 550 रुपयांच्या बनावट नोटा जप्त
पंढरपूर: बनावट नोटा तयार करून पंढरपुरातील बाजारात वापरात आणण्यासाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता दोन हजार, 500 रूपये, 100 रूपये, 50 रुपयांच्या अशा एकूण 11,550 रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. या बनावट नोटा तयार करणाऱ्या मशिनसह सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताच्या अनुषंगाने 13 सप्टेंबर रोजी काही पोलीस पेट्रोलिंग करीत असताना केबीपी कॉलेज चौकात उभे होते. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे नाव, गाव याबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत होता. त्यानंतर त्यास शहर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान पुन्हा त्यास विचारणा केली असता रणजित सुखदेव राजगे (वय 22, रा. कुसमोड, पो. पिलीव, ता. माळशिरस) असे त्याने नाव सांगितले.

त्याच्याजवळील बॅग तपासली असता दोन हजार रुपयांच्या 2 नोटा, 500 रुपयांच्या 10 नोटा, 100 रुपयांच्या 19 नोटा, 50 रुपयांच्या 13 नोटा अशा एकूण 11,550 रुपयांच्या बनावट नोटा त्याच्याकडे आढळून आल्या.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत देशमुख यांनी पंचनामा करून संबंधीत तरुणावर गुन्हा दाखल केला. त्या तरुणाच्या घराची झडती घेतली असता कलर प्रिंटर, विविध रंगाच्या शाईच्या चार बाटल्या, नोटांचे अर्धवट प्रिंट असलेले कागद, तीन मोबाईल, 14 सीमकार्ड मिळून आले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.

ही कामगिरी गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि नवनाथ गायकवाड, सपोफौ हनुमंत देशमुख, सुजित उबाळे, मच्छिंद्र राजगे, संदीप पाटील, प्रसाद औटी, अभिजीत कांबळे यांनी केली. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक नवनाथ गायकवाड करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here