पीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपींचा ताबा द्या

ईडीची विशेष न्यायायलयात मागणी

मुंबई : पीएमसी बॅंक घोटाळ्याने देशाला पुन्हा एकदा हादरून सोडले आहे. कोट्यवधींचा घोटाळा समोर आल्याने बॅंकेतील खातेदारांमध्ये संतापाचे वातावरण पहायला मिळत आहे. या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या माजी अध्यक्ष वरियम सिंह, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग यांना आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या तिघांना ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. ईडीनेही कर्ज घोटाळ्याची दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे. दरम्यान, या तिघांना किल्ला न्यायालयाने 23 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचा ताबा मिळावा, अशी मागणी अर्जामध्ये करण्यात आली आहे. तसेच पीएमएलए या कायद्यांतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांचा ताबा हवा असल्याचे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने आतापर्यंत या प्रकरणी 3 हजार 800 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांचा ताबा मिळवण्यासाठी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

वरियम सिंह, वाधवान पिता-पुत्राला जामीन देऊ नये, या मागणीसाठी बॅंकेच्या खातेदारांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. तत्पूर्वी न्यायालयाबाहेर जमलेल्या खातेदारांनी आरबीआयने तीन सामान्यांचा बळी घेतला अशा आशयाचे फलक झळकावले. बॅंकेसह रिझव्र्ह बॅंकेचा निषेध नोंदवला. दगावलेल्या संजय गुलाटी, फत्तेमुल पंजाबी, डॉ. निवेदिता बजलानी या पीएमसी बॅंक खातेदारांना उपस्थित जमावाने आदरांजली वाहिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)